Monday, January 25, 2010

अपघात

संध्याकाळचे सात वाजून गेलेले.नाशिकरोडला गाडी पोहोचली, सुधीर देशमुख आणि तुषारचे मोबाईल फोन वाजायला लागले.लाइफ लाईन हॉस्पीटलचा पत्ता विचारायला जागोजागी गाडी थांबत होती.घड्याळाचे काटे मंद, गाडीची गती त्याहूनही मंद वाटत होती.कधी एकदा हॉस्पीटलमध्ये जावुन प्रत्यक्ष पाहू असं वाटत असतानाच काय बघायला मिळणार आहे या भितीने अजून लांबच असल्यान बरही वाटत होतं. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला होता.कुठच्याही क्षणी फोन वाजला कि त्याहून जोरात छातीत धडधडे.सुधीर आणि तुषार मला समजणार नाही अशा बेतानं बोलत होते कि मला तसं वाटतं होतं कोण जाणे? आठ वाजून गेले असावेत, आमची गाडी हॉस्पीटलच्या आवारात शिरली, समोरुन फॅक्टरीतील लोकांचा घोळका आला. रमेशचे मित्र श्रीकांत जोशी तेवढे माझ्या ओळखीचे होते, ते फॅक्टरीतील नसल्याने जरासे दूर होते, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे हसू नव्हते, पण आम्ही आल्यामुळे एक प्रकारचा सुटकेचा निःश्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला.
२५ मार्च २००३, माझे पती रमेश कंपनीच्या कामाकरीता त्यांच्या नाशिकच्या फॅक्टरीत जाण्यासाठी सकाळी साडेसहाला गाडी घेवून निघाले,त्यांच्या सोबत फॅक्टरीतील त्यांचे एक सहकारी देशपांडे देखील होते. मिटींग संपवून ते रात्री परत येणार होते.महिन्यातून नाशिक वा मुंबई अशा त्यांच्या नेहमीच फेऱ्या होत आणि ते स्वतःच गाडी चालवत.त्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफीसला गेले.सकाळी दहा पासून मी त्यांना मोबाईल वर फोन करत होते पण तो लागत नव्हता ,माझ्या मनात शंका -कुशंका येवू लागल्या, मी त्यांच्या पुण्यातील ऑफीसला फोन करुन नाशिकला ते पोहोचलेत का, तिकडे फोन करुन मला कळवा असे सांगितले फोन वरचे माझे बोलणे संपत नाही तोच त्यांच्या ऑफीसमधून सुधीर देशमुख आणि त्याचा सहकारी माझ्या ऑफिसमधे आले.त्यांनी मला रमेशच्या गाडीला अपघात झालाय आणि त्यांच्या पायाला लागलयं असं मोघमच सांगितले आपण नाशिकला जाउया असं म्हणाले. मुली शाळेतून घरी यायच्या होत्या, त्यांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या.सुधीर म्हणाले,"आपण मुलींना घरी सोडून मग जाऊ" घरी गेल्यावर मुलींना मोठ्या बहिणीकडे पाठवायचे ठरवले.२-४ कपडे, होते तेवढे पैसे घेउन आम्ही बाहेर पडलॊ.जाताना रमेशचा जवळचा मित्र तुषार याला घेऊन जायचे ठरवले, त्याला माझ्या आधीच या घटनेची माहिती झालेली होती आणि त्याने नाशिकला निघायची तयारीही केली होती.मला घटनेचे गांभीर्य जाणवू न देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.जाता जाता पुण्यातील त्यांच्य़ा फॅक्टरीत गेलॊ तेथे पर्सनल मॅनेजर पाटील आंम्हाला बघून म्हणाले," हे काय तुम्ही अजून इथेच, त्या देशपांड्याकडील लोक कधीच गेले, आणि रमेशचा C.T.scan केलाय, त्याची कंडीशन फारशी चांगली नाहीय. निघा तुम्ही ताबडतोब" हे ऎकुन हातापायातले त्राणच गेल्यासारखे वाटले.नाशिकच्या रस्त्याला लागलो.कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.वेळ आणि रस्ता संपता संपत नव्हता.चार वाजता मी तुषारला म्हटलं,"कुणाला तरी फोन करुन C.T.scan चा रीपोर्ट विचारु या?"
त्याने फोन केला "रीपोर्ट ठिक आहे "असं समजताच गाडी थांबवून मला त्याने आणलेला डबा खायला लावला,त्या दोघांनीही थोडे थोडे खाऊन घेतले, चहा घेतला आणि पुढे निघालो.
आय.सी.यू.मधले तंग वातावरण. मी आत जाताच आतले नाशिकचे लोक अपघात कसा झाला सांगू लागले,अनेक जागी जखमा आणि नळ्यांमधून चेहरा दिसणे मुश्कील होते.औषधांची ग्लानी होती, C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सगळे मला सांगत होते.पुरुषांच्या वॉर्ड मध्ये मला राहता येणार नव्हते.सकाळ पासून डोक्यावर घेतलेला असह्य ताण,रमेशना योग्य वैद्यकीय मदत वेळेवर मिळालेली बघुन बराचसा कमी झाला.रात्री मला श्रीकांत जोशी त्यांच्या घरी घेवून गेले, तेथे गेल्यावर माझ्या डॉक्टर मैत्रीणीला फोन लावला,आता नाशिक मधील चांगले डॉक्टर शोधणे,जवळच्या नातलगांना या घटनेची माहिती देणे, मुलींची चौकशी आदी केले पाहिजे असे काही काही सुचू लागले.मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते किती खरं आहे याचा अनुभव मी प्रवासभर घेतला असल्याने प्रवासाचा शिण म्हणा ,विचारांमुळे आलेला थकवा म्हणा किंवा पेशंट्च्या खऱ्या अवस्थेच्या अनभिज्ञतेने म्हणा त्या रात्री मी गाढ झोपले.पहाटे पाच वाजता जाग आली,सुजाता , श्रीकांत जोशींची बायको जागीच होती रात्री ते मला सोडून परत हॉस्पीटलमध्ये गेले होते आणि तेथे झोपायला कुणी नसल्याने तेथेच थांबले होते.सकाळी साडेसहाला मी हॉस्पीटलमध्ये गेले.
सकाळी मला रमेशने ओळखले पण मी कधी आले,कशी आले काही विचारले नाही,हे माझ्या त्यावेळी लक्षात नाही आले, प्रत्येक मिनिटाला ते उठण्याचा प्रयत्न करीत, सलाइनच्या नळ्या उपसून टाकीत. मला फॅक्टरीत जायचयं आज मिटींग आहे. असं बोलू लागल्यावर माझा धीरच खचला. डॉक्टर राऊंडला आले, त्यांनी पुन्हा C.T.scan चा रीपोर्ट नॉर्मल आला होता त्यामुळे काळजीचे कारण नाही असे सांगितले."मग असे असंबध्द बोलायचे कारण काय? " असे मी धीर करुन विचारले त्यावर ते म्हणाले ,"मेंदुला सूज आली आहे, हॆड इंजुरीमुळे , औषधे चालू आहेत होईल कमी हळूहळू . बाकी हाडांचा चुरा झाला तरी चालतो, मेंदुच्या इजा बऱ्या होणे कठीण असते तुम्ही खूप लकी आहात थोडक्यात निभावले आहे,it was a major accident " डॉक्टरांचे आभार मानून मी पेशंट पाशी आले , "मला काय झालयं?" हा एकच प्रश्ण त्यांनी एक तासात किमान १०० वेळा विचारला , पुन्हा पुन्हा उठायला बघणे, कंपनीत जायचा हट्ट करणे एक ना दोन असे चमत्कारीक वागणे केवळ डॉक्टरांच्या अश्वासक बोलण्याने मी सहन करायला सुरुवात केली. नाशिक मधुन कंपनीतील लोकांची, ओळखीच्या,नात्यातल्या लोकांची भेटायला रीघ. प्रत्येकाला त्या घटनेची माहिती देणे,डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणुन देणे,मधेच फोन आला तर तो घेणे अशी अखंड धावपळ. मार्च एंडींग असल्याने कंपनीत कामाची धावपळ होती तरी कंपनीतून कोणी ना कोणी तरी संध्याकाळी येई आणि मला बळेच बाहेर पाठवी जरा बाहेर चक्कर मारून या तास भर आम्ही इथे बसतो. मी बाहेर पडे पण बाहेरही अखंड अस्वस्थच वाटे.आणि परक्या गावात जाणार तरी कुठे?
नाशिक सारख्या अनोळखी गावात माझे कुणीच जवळचे नातलग नव्हते पण मला जे अनुभव आले त्यामुळे आज नाशिक मला अनोळखी वाटत नाहीच पण ज्यांनी मला मदत केली ते नातलगांहून जवळचे झाले.आता वाटते नाशिकला होते म्हणूनच त्यातून निभावू शकले. आमच्या पुण्यातल्या वाड्यात राहणाऱ्या कुलकर्णी दादांचे नातेवाईक धर्माधिकारी, त्यांना दादा कुलकर्णींनी कळविले , समजल्या बरोबर ते हॉस्पीटलमध्ये आले.मला म्हणाले,"तू माझ्या घरी चल रहायला घरी आम्ही दोघे पती-पत्नी आणि माझी आई असतो मोठं घर आहे इथून जवळ आहे शिवाय मी रीटायर्ड आहे कधीही हॉस्पीटलमध्ये येऊ -जावु शकतो."मला त्यांनी घरी नेलेच.माझ्या चुलत वहिनीचे वडील असेच लगेच आले त्यांना तर मी चुलत भावाच्या लग्नानंतर त्याचवेळी बघीतले पण त्यांनी देखील असाच प्रेमळ आग्रह केला, मझ्या चुलत भावाचा मित्र नाशिकच्या नोटांच्या कारखान्यात मॅनेजर होता, तो आला तो ही म्हणाला माझ्या घरी चला. ’अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ मदतीच्या बाबतीत माझी अशी अवस्था झाली.प्रत्येक जण आपापल्या परीने मला मानसिक आधार देत होता.प्रत्येक जिल्ह्यात आमच्या ऑफीसचे दोन कर्मचारी(district informatics officers) जिल्हाधिकारी कार्यालयात असतात.मी पुण्यात माझ्या ऑफीसमध्ये कळविले होते.तेथून नाशिकच्या साळवींना माझ्या मैत्रीणीने कळवले.समजल्याबरोबर साळवे मला भेटावयास आले, त्यांनी सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रुम्स बुक करुन दिल्या,आमच्या पुण्यातल्या लोकांना रहाण्यासाठी.शिवाय स्वतःची स्कुटर मला दिली.दररोज सकाळ संध्याकाळ येवुन चौकशी करीत.पुण्याहून माझे दोन चुलत दीर आणि दोघे परिचित माझ्या सोबत होते,रात्री झोपावयास त्यांच्यापैकी कुणीतरी अलटून पालटुन थांबत असे दिवसा मी असे.
रमेशच्या डोक्याला जबर दुखापत झाली होतीच.पण उजव्या मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झालेले होते,पायाचे ऑपरेशन करणे गरजेचे होते,हे ऑपरेशनही मोठे होते,ते नाशिकला करुन मग पेशंट्ला पुण्याला न्यायचे कि पुण्याल नेवुन ऑपरेशन करायचे असा प्रश्ण होता.लाइफ लाईनच्या आय.सी.यू मधुन ७२ तासांनंतर बाहेर आल्यावर पुढील महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा होता.दुपारची वेळ होती.मी कुठलेसे पुस्तक वाचायचा प्रयत्न करीत होते,आय.सी.यू वॉर्ड मधील केरळी मेट्र्नने मला बोलावले.पेशंट साठी दोन शहाळी घेवुन ये म्हणाली.मी बाहेर जावुन २ शहाळी आणली.एकातील पाणी तिने पेशंटला प्यायला दिले.आणि दुसरे शहाळे फोडून त्यातले पाणी ग्लासमध्ये घालून मला जवळ बोलावले आणि म्हणाली ,’हे पाणी तू पी.सकाळ्पासून मी बघतीय तू या स्टूलावर बसून आहेस.स्वतःच्या तब्येतीची आबाळ केलीस तर त्याच्या कडे कशी बघणार?’ मला अगदी मोठ्या बहिणीसारखे जवळ घेत तिने पाणी प्यायला लावले.त्या क्षणी दोन दिवस थोपवलेला बांध फुटून मला रडू फुटले.कोण होती ती माझी? बरं ,त्या हॉस्पीटलमध्ये आय.सी.यू वॉर्ड्मधे सुध्दा १२ पेशंट होते सगळेच सिरीयस. या सगळ्या गदारॊळात तिचे माझ्या पेशंट्कडेच नाही तर माझ्यावर हि किती लक्ष होते.मला जवळ घेत ती माझी समजूत काढ्त होती.
पुण्यातल्या लोकांचे मत, पायाचे ऑपरेशन पुण्यात आणून करावे. फिजीशियचे मत पेशंटला ऑपरेशन झाल्याशिवाय हलवू नये,त्यात धोका आहे असे होते.नाशिक मधील प्रसिध्द अस्थितज्ञ डॉ.भरत केळकर यांचे नाव नाशिकच्या बऱ्याच लोकांनी सुचविले होते.त्यांनी लाइफ लाईन हॉस्पिटल मध्ये येवुन पेशंटला बघण्याची संमती दिली.ठरल्या प्रमाणे बरोबर संध्याकाळी सात वाजता त्यांची गाडी हॉस्पिटल मध्ये आली.पेशंट जवळ जाऊन त्यांनी अतिशय मृदू शब्दात त्यांची चौकशी केली,मात्र पेशंट बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. डॉक्टरांनी मला बोलावून घेतले. केसपेपर्स, x-ray पाहिले.आणि म्हणाले,’पेशंट्ची स्थिती सुधारल्याशिवाय ऑपरेशन करणे योग्य नाही.’
’पण मग किती दिवस थांबावे लागेल?’
’२ दिवस,४ दिवस कदाचित आठ दिवस सुध्दा मेंदूची सूज कमी झाली पाहिजे’
’ पण ऑपरेशन केल्या शिवाय पुण्याला नाही जाता येणार, आणि मला इथे जास्त दिवस रहाणे कठीण आहे’
’मग तुम्ही पेशंट्ची मेंदूची सूज कमी झाली कि पुण्याला जा, तिकडे जावून ऑपरेशन करा.’
’ते धोकादायक असते असे म्हणत होते दुसरे डॉक्टर’
’नाही, तसं काही नाही.मी स्वतः त्यांचा पाय व्यवस्थित पॅक करुन देतो, ती माझी जबाबदारी’
’आणि आम्ही इथंच थांबायच ठरवलं तर?’
’तर मी त्यांचे ऑपरेशन करेन.पण मला कल्पना आहे, पेशंटच्या घरच्या लोकांच्या काही अडचणी अशा असतात कि त्या डॉक्टरांजवळ बोलू शकत नाहीत.तुम्हाला पुण्याला जाऊन ऑपरेशन करणे सोयीचे ठरत असेल तर तसे करा.’
आपण आजकाल डॉक्टरांबद्द्ल बरचं बरं-वाइट ऎकतो,पैशासाठी पेशंटला टेस्ट्च्या नाना चक्रातून फिरवणाऱ्या गोष्टी ऎकतॊ,केळकर डॉक्टरांच्या बोलण्यातून मला त्यांचा पेशंटची प्रकृती आणि त्याच्या घरच्यांच्या अडचणींचा विचार महत्वाचा हे जाणवले,आणि त्या क्षणी मी नाशिकला त्यांच्या कडून ऑपरेशन करुन घेण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांचे ऑपरेशन अतिशय व्यवस्थित झाले,डॉक्टर केळकरांच्या हॉस्पिटल मध्ये आम्हाला अतिशय उत्तम अनुभव आला.ऑपरेशन् नंतर चार पाच दिवसात त्यांनी पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली.
नाशिकच्या वास्तव्यात मला रमेशचे फॅक्टरीतले सहकारी,मित्र,नातेवाईक यांची एवढी मदत मिळाली की एकही क्षण मला एकटे वाटले नाही.एका जिवघेण्या अपघातातून रमेशना जीवदान मिळाले.’सकळ जनांचा करीतो सांभाळ तुज मोकलील ऎसे नाही’एकनाथांच्या या ओवीचे मला प्रत्यंतर आले, माझ्या प्रारब्धीचे भोग माझ्या सख्या सोयऱ्यांच्या रुपातील हरी मुळे सोसणे सुकर झाले.

3 comments:

संवेदना said...

फार भयानक आहे हे असे काही अपघात वगेरे...पण तु आणी तुझे कुटुंबीय लवकरच यातुन बाहेर याल.असे मदतीचे बरेच हात मिळतातच आपल्याला आपल्या आपत्तीत.आपणही कोणाकोणाला मदत करत रहावी आपापल्या परीने. तुझ्या धैर्याबद्दल तर तुझे कौतुकच आहे.सगळे चांगलेच् होइल् अशीच खंबीर रहा.

भानस said...

संवेदनाशी सहमत. अशी वेळ कोणावरच येऊ नये. लवकरच सगळे काही पूर्ववत होईल. अनेक शुभेच्छा.

शंतनु said...

atishay bhayanak. mala athavta ahe ki mi Ramesh kakanna tevha bhetlo hoto ani he jevha aikla tevha atishay bhayanak watla hota. (mi tumhala olakhto, kadachit tumhala athavnar nahi). Daivayog ahe khara!